वसई वृत्तसंस्था । ग्राहकाने तोंडावर मास्क घातला नसल्यामुळे पेट्रोलपंप चालकाने पेट्रोल नाकारल्याने 10 ते 15 गावगुंडांनी वसईत पेट्रोल पंपावर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यात पोलिसांच्या समोरच जमावाकडून पेट्रोल पंप मालक, महिला कर्मचारी यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पेट्रोलची मशीन, कॅबिनच्या काचांचीही तोडफोड करण्यात आली आहे तब्बल अर्धा तास सर्व राडा करुन हल्लेखोर फरार झाले. वसईच्या माणिकपूर येथील बेसीन पेट्रोल सप्लाय कंपनी या पेट्रोल पंपावर काल (18 सप्टेंबर) सायंकाळी पावणे 7 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
वसईच्या माणिकपूर येथील बेसीन पेट्रोल सप्लाय कंपनी या पेट्रोल पंपावर सायंकाळी पावणे 7 च्या सुमारास दोन जण बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी मास्क न घातल्याने पेट्रोल कर्मचाऱ्यांनी पेट्रोल बाईकमध्ये भरण्यास मनाई केली. त्यानंतर बाईकवाल्यांनी बाईक तेथेच ठेवून, पेट्रोल मालकाशीही हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी जवळपास 20 ते 30 जणांचा जमाव घेवून आले.