जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बट प्रशिक्षण केंद्र सन १९९९ मध्ये मंजूर झाले होते. ते पोलीस प्रशिक्षण केंद्र तातडीने सुरू करावे अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य, गृहखाते ऍड. जमील देशपांडे यांनी केली आहे.
वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बट प्रशिक्षणकेंद्र सन १९९९ मध्ये मंजुर झाले आहे. तत्कालीन गृहमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांनी जागेचे भूमिपूजन सुध्दा केले होते. या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे म्हणून जळगाव जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय नेते कमी पडले. परिणाम असा झाला की हे केंद्र अहमदनगर जिल्ह्यात स्थलांतर करण्याची बातमी आज वर्तमान पत्रात प्रसिध्द झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास जिल्ह्यातील अर्थव्यवस्था गतिमान होईल. दळणवळण हालचाल वाढेल व जिल्ह्यात एक चांगला प्रकल्प आपण सुरू केला म्हणून आपले कार्य जिल्ह्यात कायम स्मरणात राहील. तरी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणात लक्ष द्यावे अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.