जळगाव,प्रतिनिधी । वनमहोत्सवात नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी जळगाव वनविभागाकडून सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. वृक्षप्रेमी नागरिक, शासकीय, निमशासकीय यंत्रणा यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी केले आहे .
वन विभागातर्फे दरवर्षी १५ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी वनमहोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो या वन महोत्सव कालावधीत लहान पिशवीतील प्रति रोपासाठी ८ रूपये दर आकारण्यात येणार असून सर्वसाधारण कालावधीतील या रोपांचा हा दर १५ रूपये आहे. तर मोठ्या पिशवीतील रोपांचा दर ४० रूपये असून सर्वसाधारण कालावधीत या रोपांचा दर ७५ रूपये असे आहेत. जळगाव वनविभागाकडे आज चार लाख २१ हजार रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत तसेच एक लाख औषधी रोपे देखील लागवडीसाठी उपलब्ध आहेत. तरी शासकीय यंत्रणा, निमशासकीय यंत्रणा, वृक्षप्रेमी नागरिक यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या सवलतींचा लाभ घेऊन वृक्ष लागवड करावी. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सन २०१९ मध्ये लागवड केलेल्या रोपांपैकी मेलेल्या रोपांच्या जागी नवीन रोपांची मागणी केल्यास २० टक्के रोपे मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. या सवलतीचाही लाभ घेण्याचे आवाहन जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी केले आहे.