चोपडा, प्रतिनिधी । सापांमुळे अन्नसाखळी संतुलित राहून नैसर्गिक समतोल राखला जातो. सर्प हे शेतकऱ्यांचा मित्र असून उंदरांची संख्या नियंत्रित करण्याचे काम करतात. त्याबरोबरच सर्पामुळे प्रतिविष तयार करण्यास मदत होते अशी माहिती सर्पमित्र कुशल अग्रवाल यांनी दिली. ते महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आज (दि. १४ फेब्रुवारी) रोजी ‘सर्प-समज व गैरसमज’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एन. सोनवणे, सौ.एम.टी.शिंदे, सौ.आर.पी.जैस्वाल आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
कुशल अग्रवाल पुढे म्हणाले की, सर्प दंशाने दरवर्षी ८१००० व्यक्तींचे मृत्यू होतात. त्यामुळे विनाकारण सर्प पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केले. जखमी साप दिसल्यास सर्प मित्रांना फोन करून त्यावर तात्काळ उपचार करायला हवे कारण सर्प नैसर्गिक संतुलन राखणारा निसर्गमित्र आहे. वन्य जीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यांनी पीपीटीद्वारे विषारी, बिनविषारी व निमविषारी सापांविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार एम.एल.भुसारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सौ. एस. बी. पाटील, बी. बी. पवार, शाहीन पठाण यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.