पासबुक पाहण्यापेक्षा बुक वाचनाला वेळ द्या – अनिरुद्ध कांबळे

अमळनेर, प्रतिनिधी | माणसाच्या जीवनात नोकरी, उद्योगधंदा, व्यवसाय, मोलमजुरी या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच त्यापेक्षा अधिक ज्ञान आत्मसात करण्याची गोष्ट महत्त्वाची आहे. आपण पासबुक पाहण्यापेक्षा बुक वाचनाला अधिक वेळ देण्याची गरज असल्याचे मत आकाशवाणी जळगाव केंद्राचे निवृत्त कार्यक्रमाधिकारी अनिरुद्ध कांबळे यांनी व्यक्त केले.

 

अमळनेर येथे मराठी वाङ्मय मंडळ, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, सत्यशोधकी साहित्य परिषद यांच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळाच्या नांदेडकर सभागृहात आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. अविनाश जोशी अध्यक्षस्थानी होते. सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी श्री. कांबळे म्हणाले की, पुस्तके वाचता वाचता आपल्याला आपणही कळायला लागतो. आपण कळायला लागलो म्हणजे सभोवतालचे जग आपल्याला साद घालते आणि यांमुळेच आपल्याला सामाजिक भान येत असते. सामाजिक भान आले की, संवेदना, वास्तवता लक्षात येते. यांतून आपण व्यक्त होणे म्हणजेच समाज घडविणे होय. डॉ. बागूल म्हणाले की, आपले वाचणे आणि लिहिणे जगण्याला सर्वार्थाने समृद्ध करीत असते. ज्ञान आत्मसात करण्याबरोबर माणसं वाचायला शिकलो पाहिजे. माणसाच्या जगण्याच्या तर्‍हा आपल्या लक्षात येतात. त्या वेळी वास्तवता, त्याचे जगणे आपल्याला अनेक अनुभव देऊन जाते. माणसाच्या मैत्रीला कोणत्याही भूभागाच्या सीमा नसतात. त्या मैत्रीला अधिकाधिक वृद्धिंगत आणि एकरूपता कशी आणता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी मांडले. डॉ. जोशी म्हणाले की, माणसाच्या अनेकविध गरजा आहेत, त्यातली मैत्रीची गरज त्यांच्या जगण्यासाठी, त्याच्या जीवनासाठी किती अनमोल आहे, हे आपल्या जीवाभावाच्या मित्रांच्या अनुभवातून सिद्ध होत असते. माणसे कोणत्या कार्यालयात कोणत्या व्यवसायात कामे करतात, त्यापेक्षा त्या कार्यालयाची, व्यवसायातली त्यांच्या कामातून जी ओळख निर्माण करतात, ती ओळख महत्त्वाची असल्याचेही मत त्यांनी याप्रसंगी मांडले. याप्रसंगी भाऊसाहेब देशमुख, दिनेश नाईक, शरद सोनवणे, अविनाश संदानशिव, निरंजन पेंढारकर, गोकुळ बागूल, दिलीप सोनवणे, प्रा. लीलाधर पाटील आदी उपस्थित होते. रणजित शिंदे यांनी श्री. कांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्यातल्या माणूस जोडण्याच्या स्वभावाबद्दल मांडणी केली. प्रा. डॉ. प्र. ज. जोशी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. रमेश पवार यांनी प्रास्ताविक केले.  वसुंधरा लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र निकुंभ यांनी आभार मानले.

Protected Content