जळगाव : वृत्तसंस्था । ऐन मध्यरात्रीची वेळ… वडिलांना अत्यवस्थ वाटू लागते…शहरातील दवाखाने पालथे घातले … अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रात्री २ वाजता वडील दाखल झाले आणि यशस्वी उपचार घेत १२ दिवसांनी बरे होऊन घरी परतले !. त्यानंतर मुलांनी कृतज्ञता म्हणून चक्क ३१ हजार रुपयांचा धनादेशच अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सुपूर्द केला.!
शहरातील कालिकामाता मंदिर परिसरातील ओंकारनगरातील रहिवासी राजेश चौधरी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर १० एप्रीलरोजी त्यांच्या मुलांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेवर दाखल झाल्यावर व योग्य ते उपचार मिळाल्यामुळे राजेश चौधरी यांना बरे वाटू लागले. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना २२ एप्रिलरोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.
वडिलांना मिळालेल्या उपचारामुळे कृतज्ञता म्हणून त्यांची मुले लोकेश, गोपाल व मुलगी मेघा यांनी वैद्यकीय सेवेसाठी ३१ हजार रुपयांचा धनादेश गुरुवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केला. याबद्दल अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड, अधिसेविका कविता नेतकर आदी उपस्थित होते.