बीजिंग : वृत्तसंस्था । वुहानमधील मीट मार्केटमधील जंगली जनावरांचं मांस विकणाऱ्या दुकानांना आता कुलुप लावण्यात आलं आहे. हळूहळू संपूर्ण चीनमधील लोक आता कोणत्याही जंगली जनावरांचं मांस खाणे टाळू लागले आहेत. तसेच चीनच्या सरकारनेही याबाबत काही कायदे तयार केले आहेत.
वुहानमधील हुआनन मार्केट संपूर्ण जगभर लोकप्रिय आहे. या मीट मार्केटमध्ये एक-दोन नव्हे तर १०० हून अधिक प्रकारच्या प्राणी आणि पक्ष्यांचे मांस विकले जाते. कोरोनापूर्वी या मार्केटमध्ये मोर, लांडगा, वटवाघूळ, उंदीर, पँगोलिन, विविध प्रकारचे साप आणि अनेक प्रकारच्या दुर्मिळ प्राण्यांचे मांस विकले जायचे. कोरोनाचा पहिला रुग्ण याच मार्केटमध्ये आढळला होता.
जुन्या चुकांमधून धडा घेत वुहानवासी आता सजग होत आहेत. येथील मीट मार्केट आणि हॉटेलांमधील मेनू बदलू लागले आहेत. विशेष म्हणजे मेनूमधून जंगली जनावरं कमी होऊ लागली आहेत. चीनचं सरकारदेखील या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. मीट मार्केटमध्ये कोणत्या प्राण्यांचे मांस विकले जात आहे, यावर सरकारचं बारीक लक्ष आहे. येथे तपासणी पथकाकडून सातत्याने तपासणी केली जात आहे.
12 महिन्यांपासून जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरु आहे. चीनने कितीही नाकारलं तरी कोरोना हा विषाणू त्यांच्याच देशातून आला आहे हे आतापर्यंत अनेकांनी पटवून दिलं आहे. चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा जन्म झाला असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अनेक राष्ट्रांनी, तज्ज्ञांनी, आरोग्य संघटनांनी, संस्थांनी तसा दावा केला होता, पुढे तो खरा ठरला.
अनेक वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की, कोरोना हा आजार चीनच्या वुहानमधील मीट मार्केटमधूनच (मांसाची विक्री केली जाते असा बाजार) मानवी शरिरात घुसला. या मीट मार्केटमध्ये वटवाघूळ, उंदीर, पँगोलिन, साप आणि इतर अनेक जंगली जनावरांना मारुन त्यांचे मांस विकले जाते. वैज्ञानिकांच्या मते वटवाघूळ किंवा पँगोलिनद्वारे कोरोना हा आजार पसरला आहे. कोरोनाचं संकट ओढवल्यानंतर वुहानमधील मीट मार्केटमधून आता अशा दुर्मिळ जंगली जनावरांचं मांस आता गायब झालं आहे.