लोकांनी जिल्हा रुग्णालयातील सिलेंडरच पळवले

 

भोपाळ : वृत्तसंस्था ।  लोकांनी  मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यात चक्क जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या रुग्णालयात दोन दिवसांत दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे.

 

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अभुतपूर्व अशी परिस्थिती निर्माण केली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असून, रुग्णवाढी वेगानं होत आहे. याचा भार आरोग्य यंत्रणासह रुग्णांना लागणाऱ्या सुविधांवरही पडला आहे. त्यामुळे बेड, आयसीयू बेड, रेमडेसिवीरसह ऑक्सिजनचा कधी नव्हे इतका तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत  आहेत

 

मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यात ही घटना घडली आहे. दामोह येथील जिल्हा रुग्णालयाचं रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोविड रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधांसह ऑक्सिजन सिलेंडरचा पुरेसा पुरवठा केला जात असल्याचा दावा केला जात असतानाच ही घटना घडली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन स्टोअर रुममध्ये घुसून लोकांनी सिलेंडर पळवले आहेत. मंगळवारी रात्री ही घटना घडली.

 

रुग्णालयात अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा असतानाही लोकांनी ऑक्सिजनचा ट्रक आल्यानंतर लोकांनी सिलेंडर पळवले. ऑक्सिजन सिलेंडर पळवणाऱ्या लोकांची ओळख पटवली जात असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत, अशी माहिती दामोहच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

 

 

लोकांनी सिलेंडर पळवल्याच्या घटनेनंतर डॉक्टर आणि नर्सेसनी काम बंद केलं होतं. पोलिसांनी रुग्णालयाची सुरक्षा वाढवल्यानंतर डॉक्टर पुन्हा कामावर परतले. या जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच सोमवारी ऑक्सिजन सिलेंडर चोरीची घटना घडली होती. त्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. मात्र कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Protected Content