लोकसाहित्याचे एक पर्व अस्तास गेले ; साहित्यिकांची भावना

 

जळगाव, प्रतिनिधी ।लेखक, समीक्षक प्रा. डॉ. किसन पाटील यांचे आज  उपचारादरम्यान  निधन झाले. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यात लोकसाहित्याचे एक पर्व अस्तास गेले अशी भावना व्यक्त होत आहे.

प्रा. डॉ. किसन पाटील यांना आदरांजली वाहतांना सत्यशोधकी साहित्य परिषदचे जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल  यांनी सांगितले की,  गुरुवर्य प्राचार्य डॉ. किसन पाटील ज्यांच्या लेखणीने नव लेखकांना प्रेरणा आणि त्याच बरोबर लेखनासाठी पाठबळ मिळत असायचे. सार्‍या लेखकांना आता पोरकेपण वाटू लागेल. त्यांच्या एकूणच साहित्यातून वाचकाला लेखकांना त्यांनी नवनवीन विषय दिलेले आहेत. आपल्या लेखनातून समाज आणि देश हित जोपासत लेखनाची समृद्ध परंपरा पुढे नेणारा हा लेखक खानदेशातल्या अनेकांना त्यांनी लिहितं केलं. प्रत्येक भेटीच्या वेळेस नवनवीन विचार मांडणारा हा लेखक आपलेपणाची भावना जोपासणारा होता. मार्गदर्शन करणारा होता. नवी उभारी देणारा होता. त्याच बरोबर त्यांच्या अंगी असणारी कला या कलेतून त्यांनी अनेक चांगला असा संदेश देणारी समाज वास्तव मांडणारी चित्रे रेखाटली. त्यांनी लिहिलेल्या कविता त्या कवितांना त्यांनीच रेखाटलेली चित्र ती बोलकी आणि वाचकाला आनंद देणारी अशी असायची. त्यांच्या या आठवणी गहिवरून आणणाऱ्या आहेत अचानक त्यांच्या जाण्याने अनेक लेखक-कवींना ते पोरके करून गेलेले आहेत. त्यांना विनम्र आदरांजली.

डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की,  गुरुवर्य प्राचार्य डॉ. किसन पाटील यांच्या निधनाने खानदेशातील साहित्य आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. प्रमाणभाषा आणि बोली भाषा या दोन्हीतून विपुल साहित्यसंपदा त्यांनी लिहिली. लोकभाषा, लोकव्यवहार ,लोकनीती, चालीरीती यांचा चिकित्सक अभ्यास करणारा महाराष्ट्रातील एक द्रष्टा विचारवंत म्हणून सरांनी ओळख निर्माण केली. लोकसाहित्याचे एक पर्व अस्ताला गेले अशा भावना उंचबळून येत आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली सोळा विद्यार्थ्यांनी पीएच.डी.पूर्ण केले त्यात मी देखील आहे. प्रत्येक विषयाचे शास्त्रीय ,सैद्धांतिक ,आणि समीक्षात्मक मार्गदर्शन करणारे एक अद्वितीय मार्गदर्शक म्हणून सर नेहमी स्मरणात राहतील. त्यांची एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. 

 

 

 

 

Protected Content