श्री शिवचरित्र साहित्य संमेलन होणार नूतन मराठा महाविद्यालयात 

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य कालातीत असून ते आजच्या काळातही उपयोगाचे आहे. त्यांच्या साहित्याचा नव्या अंगाने विचार होण्याची आवश्यकता आहे. जळगावात जून महिन्यात होणाऱ्या श्री शिवचरित्र साहित्य संमेलनातून हा उद्देश नक्कीच यशस्वी होईल असे प्रतिपादन आ. सुरेश भोळे यांनी केले.

जळगाव येथे जळगाव जिल्हा विद्याप्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालय व इतिहास प्रबोधन संस्था आयोजित जगातील पहिल्या श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन, लोगो प्रकाशन व पत्रक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. उद्योजक अविनाश जाधव पाटील, प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, प्राचार्य डॉ.व्ही. आर.पाटील हे मंचावर उपस्थित होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून उदघाटन झाले. यानंतर फित कापून साहित्य संमेलनाचे कार्यालय, लोगो व पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष के. म.भाऊसाहेब यांच्या स्मृतीनिमित्त प्रा.डॉ. व्ही.आर.पाटील यांनी २१ हजार रुपये देणगी जाहीर केली.

जून महिन्यात दि. २६ ते २९ दरम्यान तीन दिवसीय विश्वातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलनात इतिहासकालीन नाणी, शस्त्र, प्रदर्शनासह चर्चासत्र व शोभायात्रेचे आयोजन नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. तर शिवछत्रपतींच्या काळातील ७५ सरदार घराण्यांचे वंशज,असंख्य मावळे, सातारा, तंजावर, नागपूर गादीचे वारस, जागतिक स्तरावरील शिवचरित्र अभ्यासक आदींची उपस्थिती राहणार असल्याचे संयोजन समिती सदस्य दिनेश नाईक यांनी सांगितले.

प्रसंगी बोलतांना आ.भोळे म्हणाले की, स्वराज्याच्या कामास आला तो स्वराज्याचा मावळा. छत्रपतींच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे होत आहे.त्यानिमित्त विश्वातील पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन जळगाव शहरात करण्यात आले आहे. गाढवे, खेचरांच्या माध्यमातून मावळ्यांनी अवघड डोंगर दऱ्यातून मार्ग काढला. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत सर्वसामान्य शेतकऱ्यांची चौकशी करीत. तीच पद्धती आजच्या काळात अवलंबण्याची आवश्यकता आहे.

उद्योजक अविनाश जाधव पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या इतिहासात केवळ राजकीय अंग नाही. छत्रपतींचे विचार व इतिहास केवळ महाराष्ट्रापुरता नाही. अन्य राज्यात देखील छत्रपतींचे विचार, इतिहास त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच देशाच्या राजधानी दिल्लीत छत्रपतींचे स्मारक व्हावे, यासाठी केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख म्हणाले, शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज, पोवाडे गाणारे शाहीर, लोककला,जागरण गोंधळ, परिसंवाद, कविसंमेलन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सुमारे सव्वा कोटी रूपयाहून अधिक निधी लागणार असून विविध साहित्यिक संस्था, दानशूर दाते, यांच्या माध्यमातून कार्यक्रम पार पडणार आहे. हे संमेलन आमचे म्हणून पार पडणार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.आर.बी.देशमुख तर आभार प्रदर्शन प्रा.राजेंद्र चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास आणि नियंत्रक रवींद्र पाटील, इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे, प्रा.डॉ.विनोद रायपूरे, प्रा.सुरेश कोळी,प्रविण सुशिर आदींसह महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिवप्रेमी उपस्थित होते.

Protected Content