मुंबई वृत्तसंस्था । मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठीच लोकलच्या प्रवासाची मुभा असल्याने बस आणि एसटी वाहतुकीवर ताण येत आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून या पार्श्वभूमीवर मनसेने सर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी म्हणून सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मनसे कार्यकर्ते उद्या सोमवारी नियम मोडून रेल्वेतून प्रवास करणार आहेत.
लोकलमध्ये प्रवास करण्यास परवानगी नसल्याने एसटी आणि बसमध्ये लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. लोकलमधून सर्व सामान्यांनाही प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली होती. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर मुंबईतील बसच्या गर्दीचा व्हिडिओ पोस्ट करून सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला होता. मात्र, मनसेच्या इशाऱ्यानंतरही सरकारने काहीच हालचाल न केल्याने मनसेने अखेर सोमवारी लोकलमधून विना तिकीट, विना परवानगी प्रवास करून सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या मनसे आणि प्रशासन आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता दिसत आहे.
उद्योग-धंदेही सुरू झाल्याने पालघर, ठाणे, कल्याण, कर्जत-कसाऱ्याहून मुंबईला येणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रवाशांना बसच्या प्रचंड गर्दीतून आठ तास प्रवास करत जावे लागत आहे. बस आणि एसटीतील या गर्दीमुळे कोरोना होत नाही का?, असा सवाल करतानाच जनतेच्या हितासाठी सामान्यांसाठी लोकलमधून प्रवासास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.