कोल्हापूरः वृत्तसंस्था । कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असताना राज्यातील पोस्ट कार्यालये मात्र अनेकांच्या मदतीला धावले. लॉकडाऊन काळात राज्यात साधारणता दहा हजार कोटींची देवाण घेवाण करत दीड कोटीपेक्षा अधिक लोकांना पोस्टाने आधार दिला.
विशेषता ज्येष्ठांना पेन्शन थेट घरी पोहोचवतानाच ३६ हजार औषधांचे पार्सल पोहोचवत रूग्णांच्या उपचारासाठी कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. राज्यात पोस्टाचे काम अतिशय व्यापक प्रमाणात चालते. केवळ पत्र पोहोचवणे या पलिकडे जात बचत, विक्री, बँक सेवा अशा अनेक क्षेत्रात पोस्टाचे काम सुरू झाले आहे.
२२०० विभागीय पोस्ट कार्यालय व ११ हजार ५०० ग्रामीण शाखेच्या माध्यमातून पोस्टाची सेवा कार्यरत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनची घोषणा झाली. सारे व्यवहार ठप्प झाले. पण या काळात पोस्टाची सेवा अधिक विस्तारली. राज्यातील जनतेच्या मदतीला पोस्टाचे कर्मचारी धावले. या काळात तब्बल दहा हजार कोटींची देवाण घेवाण या पोस्टातून झाली.
पोस्टाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवेतंर्गत १७ कोटींची देवाणघेवाण या काळात झाली. कोणत्याही बँकेत खाते असेल आणि त्याला आधार लिंक असेल तर पोस्टातून पैसे देण्याची सोय करण्यात आली होती. त्याचाही लोकांना फायदा झाला. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. अशावेळी पोस्टाचे कर्मचारी प्रसंगी पीपीई किट घालून हॉटस्पॉट, कन्टेन्मेट झोनमध्येही पैसे दिले.
विशेषता आजारी, ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना याचा फायदा झाला. मोबाईल, वीज, टीव्ही यासह इतर अनेक पेमेंट पोस्टात भरण्याची सोय करण्यात आली होती.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर औषधांची कमतरता भासू लागली. अशावेळी रूग्णापर्यंत औषध पोहोचवण्यात पोस्टाने मोठी कामगिरी केली. तब्बल ३६ हजार पार्सल पोहोचवत रूग्णांना दिलासा दिला. इंडिया पोस्ट किसान रथच्या माध्यमातून एक लाख किलो आंबे बाजार समित्यापर्यंत पोहोचवत शेतकऱ्यांच्या मदतीला पोस्ट धावली. लॉकडाऊनच्या काळात सारे काही ठप्प असताना पोस्टाचे कर्मचारी मात्र आपला जीव धोक्यात घालून मदतीचा हात पुढे करत होते