मुंबई प्रतिनिधी । लॉकडाउन काळात विमान प्रवासाचं बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचं रिफंड करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहून केली आहे.
कोरोनाच्या आपत्तीमुळे देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. आजवर लॉकडाउन पाळण्यात आला असला तरी आता हळूहळू अनलॉक होत आहे. काही प्रमाणात आता व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. या पार्श्वभूमिवर कोरोना लॉकडाउन काळात विमान प्रवासाचं बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचं रिफंड करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या अनुषंगाने त्यांनी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी पत्र लिहिलं आहे. अचानक लॉकडाउन घोषित केल्यामुळे या प्रवाशांचा प्रवास पूर्णत्वास गेला नाही. देशात आणि विदेशात प्रवास करण्यासाठी लाखो प्रवाशांनी विमानाचे बुकिंग केले होते. मात्र, त्यांनाही आपला प्रवास रद्द करावा लागला आहे. त्यामुळे, या रद्द झालेल्या प्रवासाच्या तिकीटांचे रिफंड लवकरात लवकर करण्याची मागणी यात करण्यात आलेली आहे. तर, ठराविक कालावधीत हे पैसे परत मिळणे आवश्यक आहे, प्रवाशांना तो ग्राहकाधिकार असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.