जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे लॉकडाऊन नियम झुगारत भाजपचे नगरसेवक, पोलिस कर्मचारी यांच्यासह काही वाळूतस्करांनी २१ एप्रिल रोजी जामनेर शिवारात एका शेतात मद्यपार्टी केली. या प्रकरणी अहवालावरून मंगळवारी जामनेर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
या नऊ जणांवर गुन्हा
भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील (वय ३२, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा), मुख्यालयातील पोलिस कर्मचारी विनोद संतोष चौधरी, सुपडू मकडू सोनवणे (४६, रा. बांभोरी), बाळू नामदेव चाटे (४५, रा. मेहरूण), विठ्ठल भागवत पाटील (३३, रा. अयोध्यानगर), शुभम कैलास सोनवणे (२४, रा. मयूर कॉलनी), अबुलैस आफताब मिर्झा (३२, रा.कासमवाडी), हर्षल जयदेव मावळे (३१, रा.अयोध्यानगर), दत्तात्रय पाटील (३२, रा. मोहाडी, ता.जामनेर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
लॉकडाऊनमध्ये गैरमार्गाने मद्यसाठा मिळवून शेतात ओली पार्टी केली होती. या पार्टीत पोलिस कर्मचारी व वाळूमाफियादेखील सहभागी होते. बिअरसह महागड्या मद्याचे घोट घेत जुगाराचा डावही रंगला होता. २१ एप्रिल रोजी मोहाडी (ता. जामनेर) येथील दत्तात्रय दिनकर पाटील यांच्या शेतात ही पार्टी रंगली. २३ एप्रिल रोजी या पार्टीतील काही फोटो ‘दिव्य मराठी’कडे उपलब्ध झाले. २४ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्धीनंतर खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बळीराम हिरे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवली होती.