लॉकडाऊनच्या कालावधीत जळगावात आदर्श विवाह ( व्हिडीओ )

जळगाव तुषार वाघुळदे । सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनच्या कालावधीत फिजीकल डिस्टन्सींगसह सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून शहरात लेवा पाटीदार समाजातील बोंडे व लोखंडे परिवारात आदर्श विवाह करण्यात आला असून याचे नातेवाईकांसाठी लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. दरम्यान, या विवाहाचे सर्वत्र स्वागत होत असून समाजातील इतरांनी याचा आदर्श घेण्याची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

अमृत बंगल्यात पार पडला सोहळा

याबाबत वृत्त असे की, धुळे येथील महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी तथा मूळचे चिनावलकर असणारे श्री. हेमंत आनंदराव बोंडे यांचा मुलगा चि. अनिकेत यांचा शुभविवाह चिनावल येथील प्रगतीशील शेतकरी कै. सुधीर लोखंडे यांची सुकन्या चि.सौ.कां.ग्रीष्मा यांच्याशी आज २५ व्यक्तींच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. प्रतिथयश व्यावसायिक चंदन अत्तरदे यांच्या रिंग रोडवरील अमृत या निवासस्थानी पार पडलेल्या या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. लेवा पाटीदार समाजात नक्कीच आदर्श विवाह असून असाच पायंडा समाजातील इतरांनी पाळावा असा संदेशच जणू बोंडे कुटुंबियांनी दिला.हा मंगलसोहळा जळगाव येथील रिंगरोड परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील प्रसिद्ध व्यावसायिक चंदन सुधाकर अत्तरदे यांच्या अमृत बंगल्यात झाला.

युट्युबवर लाईव्ह प्रक्षेपण

सध्या कोविड १९ (कोरोना) परिस्थितीमुळे लग्न सोहळ्यासाठी नातेवाईक, चाहता परिवार उपस्थित राहू शकला नाही , तसे त्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आवाहनही केले होते, असे श्री.बोंडे यांनी सांगितले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे आप्तजन व मित्रमंडळी ही विवाहाला प्रत्यक्ष उपस्थित नसली तरी त्यांना या मंगल सोहळ्याचा प्रत्येक क्षण अनुभवता यावा यासाठी या विवाहाचे युट्युब या संकेतस्थळावरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे दूरवरूनही आप्तांना या विवाह सोहळ्यात सहभागी होता आले.

लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन

याप्रसंगी हेमंत बोंडे यांचे व्याही मुलीचे (मोठे बाबा) अरविंद जिवराम लोखंडे, चंदन सुधाकर अत्तरदे, निकिता अत्तरदे, सुनंदा बोंडे, आशिष दिनेश अत्तरदे, अविनाश सुधीर लोखंडे यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती. विवाहातील खर्चाला कुठेतरी पायबंद बसावा व दूर दृष्टीकोन ठेवून होणारा नाहक खर्च टाळला जावा या प्रामाणिक हेतूने आम्ही कोरोना संसर्गजन्य आजार येण्याच्या आगोदर आम्ही साध्या पध्दतीने विवाह करण्याची मानसिकता पक्की केली होती. तर लॉकडाऊनमुळे आम्ही सर्व नियमांचे पालन केल्याची भावनाही हेमंत बोंडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, या सोहळ्यात फिजीकल डिस्टन्सींगसह प्रत्येकाला सॅनिटायझर देवून काळजी घेण्यात आली. सर्वांनी मास्क लावले होते हे विशेष. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना उच्च विद्याविभूषित वधु-वरांनी सांगितले की, विवाह सोहळ्यात नाहक होणारा खर्च वाचावा, तसेच बदलत्या काळात समोरासमोर एक आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने आम्ही आज विवाहबध्द होत आहे असे सांगून कोरोनाबद्दल आपण सुरक्षित रहा, घरी रहा, काळजी घ्या असा मोलाचा संदेश नवदाम्पत्याने दिला.

इतरांनी आदर्श घ्यावा

विवाह सोहळ्यातील वायफळ खर्चाला आळा घालून मोजक्या व जवळच्या आप्तांना प्रत्यक्ष तर इतरांना व्हर्च्युअल पध्दतीत सहभागी करून पार पडलेला हा विवाह सोहळा अनेक अर्थांनी लक्षणीय ठरला. याचे पालन समाजातील अन्य वर-वधू पित्यांनी करण्याची आवश्यकता आहे. विशेष करून लेवा पाटीदार समाजात विवाह सोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतांना या प्रकारचा विवाह हा अतिशय आदर्श व स्तुत्य असा मानला जात आहे. इतर समाजबांधवांनी याचा आदर्श घेण्याची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या विवाह सोहळण्याला समाजातील विविध ठिकाणच्या भ्रातृमंडळाच्या पदाधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

खालील व्हिडीओत पहा याबाबतचा विशेष वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/184390612734131

Protected Content