लॉकडाऊनचे नियम धाब्यावर: यावल येथे व्यावसायिकांचे दुकाने सुरूच…!

यावल प्रतिनिधी । संपूर्ण जगासह देशात सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य अशा घातक आजारामुळे भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ५० दिवसांपासून लॉकडाऊन लावले असतांना देखील शहरात याचा कुठेही परिणाम दिसून येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्यातच व्यावसायिकांनी लॉकडाऊन नियम धाब्यावर ठेवून दुकाने सुरूच ठेवली आहे.

यावल शहरात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणू आजारापासून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे यासाठी लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर फिरू नये, बाहेर जाताना तोंडाला मास्क लावणे, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पाचपेक्षा अधिक नागरिकांनी सोशल डिस्टन्स आदी नियमाचे काटेकोर पालन करावे. जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवावी, असे आदेश असतांना यावल शहरात या नियमांना धाब्यावर ठेवत व्यावसायिकांनी दुकाने सुरूच ठेवली आहे. या गंभीर आजाराचे या नागरिकांना कुठे हे गांभीर्य कळत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावल तालुक्याच्या आजूबाजूला चोपडा, अडावद आणि भुसावळ या जवळच्या गावांमध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने आपले पाय पसरविले असून देखील नागरिक बेसावध फिरताना दिसत आहे. यासाठी यावल तालुक्यातील महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व नगरपालिका यांनी तात्काळ निर्णय घेऊन शहरातील शासनाचे नियम धाब्यावर बसवून अनावश्यक सुरू असलेले व्यावसायिकांवर कळत कारवाई करून दुकाने बंद करावी. नागरिकांच्या दृष्टीने आजाराचा संभाव्य धोका टाळता येईल.

Protected Content