जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणून सध्या लॉकडाऊन सुरू आहे याचा फटका जवळपास सर्वच व्यवसायिकांना बसला आहे. यातून कुंभारही सुटले नाहीत. ग्राहकच फिरकत नसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सध्या रखरखते उन आहे. तापमानाचे ४५ शी गाठली आहे, असे असतांना माठाच्या पाण्याची चव ही औरच..! मात्र ग्राहकांची संख्या रोडावली आहे. माणसांना गारवा देणारी माठ आणि रखरखत्या उन्हात व्यवसाय करणारे कुंभार यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. दररोज आमचा साधारणत: एक ते दीड हजाराचा व्यवसाय होत असे, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून २५ टक्केही व्यवसाय होत नाही, व्यथा गयासोद्दीन यांना लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना मांडली. तर बिहार राज्यातील सिमामढी जिल्ह्यातील मुकेश कुमार हा व्यवसायिक म्हणाला, मध्यप्रदेशातील सेंधवा येथून विविध प्रकारचे मडके विक्रीसाठी आणतो मात्र या व्यवसायात मंदीचे सावट आहे. आम्ही अनेक अडचणींना सामोरे जातो. माझा परिवार माझ्यासोबत आहे. लॉकडाऊन लवकर संपावा ही अपेक्षा त्याने व्यक्त केली. तर नूतन मराठा महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य विभागात शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रसाद चित्ते याने देखील सोनवद ता. धरणगाव येथील प्रसिध्द असलेले विविध आकर्षक माठ विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. ग्राहकाची संख्या कमी असल्याने तसेच ट्रान्सपोर्टीग खर्च निघत नसल्याने आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते, या व्यवसायातून जो नफा होतो तो माझ्या कुटुंबासाठी व शिक्षणासाठी खर्च करतो अश्या भावना त्याने व्यक्त केल्या.
विविध कुंभारांकडे १५ लिटर, २५ लिटर माठ, रांजण, लोणचाच्या रंगीत बरण्या, मडके, लोटे, परवड, मातीचे भांडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. मटक्याचे दर १०० ते ३०० पर्यंत आहे, लोणच्याची बरणी ४०० ते ५०० रूपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे सांगितले. गेल्या दीड महिन्यापासून ग्राहक फिरकत नसल्याने चिंता वाढली आहे.