लॅपटॉप चोरट्यांना अवघ्या तीन तासात अटक

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खडकी बु. येथील एका शासकीय कार्यालयातून १ लाख रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरनाऱ्या चोरांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या तीन तासात ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील खडकी बु येथील औद्योगिक वसाहतीतील भारत वायर रोप मधील प्रशासकीय कार्यालयातून १ लाख रुपये किंमतीचे २ लॅपटॉप ९ मे रोजी सायंकाळी ५:३० ते ते १० मे रोजी सकाळी ९:३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची फिर्याद कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक रणधीर परदेशी चाळीसगाव यांनी दिली. त्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल होवून तपास पोलीस नाईक राहूल सोनवणे हे करीत होते.

अशात चोरीचे लॅपटॉप दोघे जण विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती डीबी चे पोलीस नाईक राहुल सोनवणे, महेंद्र पाटील यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदशानाखाली दोघांनी काल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भारत वायर रोप कंपनी परिसरात संशयित रित्या फिरत असलेले राहुल संतोष कोल्हे (वय-१८) व भूषण सुनील मुंगसे (वय-१९) दोघे रा खडकी बु ता. चाळीसगाव यांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी लॅपटॉप चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या 3 तासातच चोरीचा उलगडा करून आरोपीना ताब्यात घेणाऱ्या दोघा पोलिसांचे कौतुक होत आहे.

Protected Content