Home Cities यावल लालपरीवर वारकऱ्यांचा विश्वास! यावल एसटी आगाराला विठुराया पावला; ८८ फेऱ्यांमधून ४३ हजार...

लालपरीवर वारकऱ्यांचा विश्वास! यावल एसटी आगाराला विठुराया पावला; ८८ फेऱ्यांमधून ४३ हजार भाविकांचा प्रवास

0
6

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी लालपरीवर दाखवलेल्या विश्वासामुळे यावल एसटी आगाराचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यंदाच्या आषाढी यात्रेत प्रवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे यावल एसटी आगाराने उत्पन्नाच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यात थेट दुसरा क्रमांक पटकावला असून आगाराच्या तिजोरीत तब्बल ३० लाख ८९ हजार रुपयांची भर पडली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त यावल एसटी आगाराच्या वतीने ‘गाव तिथे बस’ हे विशेष अभियान राबवण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत यावल आगारातून पंढरपूरसाठी विशेष ३८ बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बसेसच्या एकूण ८८ फेऱ्या पूर्ण झाल्या असून तब्बल ४३ हजार ९७० प्रवाशांनी यावल आगाराच्या लालपरीने सुरक्षित प्रवास केला. प्रवाशांच्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळेच आगाराला ३० लाख ८९ हजार रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून यावल आगारात नादुरुस्त आणि भंगार अवस्थेतील बसेसची संख्या मोठी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही यावलच्या एसटी आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनावर आणि लालपरीच्या सुरक्षित प्रवासावर भाविकांनी दाखवलेला हा विश्वास अत्यंत मोलाचा मानला जात आहे. आगाराला मिळालेल्या या यशाबद्दल आगाराचे व्यवस्थापक इम्रान खान पठाण आणि तत्कालीन व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी पंढरपूरला जाणाऱ्या सर्व भाविकांचे व प्रवाशांचे मनापासून आभार मानले आहेत.


Protected Content

Play sound