भडगाव, प्रतिनिधी | येथिल ग्रामिण रुग्णालयात कार्यरत नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे हे दारुच्या नशेत तर्रर असल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत ७ दिवसात खुलासा सादर करण्याचे सुचित केले आहे.
नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे हे कार्यालयीन वेळेत दारुच्या नशेत आढळुन आले होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयात डोळे तपासणी व डोळ्याचे शस्त्रक्रिया करण्यासाठी बोलवलेले सुमारे २५ ते ३० रुग्ण ग्रामीण रुग्णालयात ताटकळत उभे होते. या गंभीर प्रकाराबाबत रुग्णानी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कार्यवाहीची मागणी केली होती. या गंभिर प्रकाराबाबत
“लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने”डॉक्टर बेधुंद अवस्थेत : रुग्ण प्रतीक्षेत https://wp.me/p7A6NV-GUt
वृत्त प्रसिध्द करत ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधत ग्रामीण रुग्णालयातील नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे याचा मनमानी व कर्तव्य कसुरचा प्रकार उघडकीस आणला होता.
या प्रकरणाची दखल घेत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. साहेबराव अहिरे यांनी नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे यांना कारणे दाखवा नोटीस बजवत आपण नेमुन दिलेल्या कर्तव्यात परायणता राखत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ३ जानेवारी २०२२ रोजी कर्तव्यावर आले असता आपण मद्य प्राशन करुन आले होते. व रुग्णाची तपासणी न करता झोपुन असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रुग्णाशी उध्दटपणे वागणे, कामात हलगर्जीपणा करणे इ. बाबी दिसुन आले आहे. नेमुन दिलेल्या कर्तव्यात कसुर, बेजबादारपणे वागणे यामुळे ग्रामीण रुग्णालयाची प्रतीमा मलीन झाली आहे. यावरुन आपल्या विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधिल तरतुदी नुसार कारवाई करण्याकामी आपला अहवाल वरीष्ठांकडे का सादर करण्यात येवु नये अशी कारणे दाखवा नोटीस नेत्र चिकीत्सक संतोष एम. अहिरे यांना वैद्यकिय अधिक्षक डाॕ. साहेबराव अहिरे यांनी दि. ६ जानेवारी २०२२ रोजी बजावली आहे. ७ दिवसाच्या आंत खुलासा सादर करण्याचे कारणे दाखवा नोटीसीत सुचित केले आहे.