लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात आयसीएमआऱच्या एका अभ्यासातून हे समोर आलं आहे की, जर करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यत कमी होतो.

 

तमिळनाडूच्या पोलीस दलातल्या एक लाख १७ हजार ५२४ जवानांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासादरम्यान लस घेतलेले जवान आणि लस न घेतलेले जवान यांच्यापैकी किती जणांचा कोरोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आलं.

 

 

 

१ फेब्रुवारी २०२१ ते १४ मे २०२१ या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासासाठी लसीचा एक डोस घेतलेले ३२ हजार ७९२ कर्मचारी निवडण्यात आले. लसींचे दोन्ही डोस घेतलेले कर्मचारी ६७, ६७३ होते तर १७, ०५९ पोलीस कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती. या अभ्यासानुसार, १३ एप्रिल २०२१ ते १४ मे २०२१ या दरम्यान ३१ पोलीस कर्मचाऱ्यांचा  मृत्यू झाला. यापैकी ४ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर ७ जणांनी एकच डोस घेतला होता. बाकीच्या २० जणांनी  प्रतिबंधक लस घेतली नव्हती.

 

या अभ्यासातून समोर आलं आहे की,मृत्यू रोखण्यासाठी लस प्रभावी आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीचा एक डोस घेतला होता, त्यांना मृत्यूचा धोका ८२ टक्क्यांपर्यंत कमी होता तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी होता असं आढळून आलं. ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या तुलनेत लस घेतलेल्या लोकांना मृत्यूचा धोका फारच कमी आहे. पहिला डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका ०.१८ टक्के होता तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका ०.०५ टक्के होता.

 

Protected Content