भुसावळात शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कंटेनमेंट झोनमध्ये ड्यूटी; कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही प्रकारचे प्रशिक्षण नसतांना शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कंटेनमेंट झोनमध्ये सेवा देण्याचे लेखी आदेश भुसावळ महसूल विभागाने दिले आहे. या आदेशामुळे शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी संभ्रमात पडले आहे.

भुसावळ शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना भुसावळातील महसूल प्रशासनाने कंटेनमेंट झोनमध्ये सेवा देण्यासाठी लेखी आदेश दिलेले आहे. नेमून दिलेल्या ठिकाणी म्हणजेच कंटेनमेंट झोनमध्ये तात्काळ हजर होण्यास सांगितले आहे. यात विशेष बाब म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील काम करायला भाग पाडताना शासनाने कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिलेले नसून कोरोना संसर्गापासून संरक्षणासाठी कोणतेही संसाधने जसे मास्क, सॅनिटायझर व इतर अत्यावश्यक साधनांचा पुरवठा न करता थेट दिलेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिल्याने कर्मचारी वर्ग संभ्रमात पडलेला आहे. या आदेशात नाव एका कर्मचाऱ्यांचे तर मोबाईल क्रमांक दुसऱ्या कर्मचाऱ्याचा आहे. असा कारभार असल्याने संभ्रम आणखी वाढलेला आहे. याप्रकाराबाबत या संबंधित कर्मचाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांना कोणतेही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. आधीच दुसऱ्या महत्त्वाच्या शैक्षणिक कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये या आदेशाने भीती निर्माण झालेली आहे.

Protected Content