लसीचा पुरवठा न वाढविल्यास सीरम इन्स्टिट्यूटला घेराव — राजू शेट्टींचा केंद्राला इशारा

 

कोल्हापूर, वृत्तसंस्था । महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोरोना प्रतिबंधित लसीचा तुटवडा जाणवत आहे. याच कारणावरून राज्य व केंद्रात तणाव निर्माण झाला असतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्राला पत्र लिहून इशारा दिला आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यामुळं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरण थांबवावं लागलं आहे. राज्याला गरज असताना केंद्राकडून पुरेशी लस पुरवली जात नसल्याचा राज्य सरकारचा आक्षेप आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातील आकडेवारीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांनीही आता केंद्राविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला थेट इशाराच दिला आहे.  राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना तसं पत्रच लिहिलं आहे. महाराष्ट्राला होणारा लसीचा पुरवठा येत्या आठवडाभरात न वाढल्यास पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला घेराव घालण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूटमधून लस घेऊन देशाच्या अन्य राज्यांत जाणारी वाहने रोखली जातील,’ असं शेट्टी यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

Protected Content