नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लष्करप्रमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन सांगितले की, लष्कराचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या मदतीसाठी उपलब्ध करू देण्यात आले आहेत. याशिवाय देशभरात विविध ठिकाणी लष्कराकडून तात्पुरती रूग्णालय देखील उभारली जात आहेत.
भारताची सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढाई सुरू आहे. दररोज लाखांच्या संख्येत बाधित रूग्ण वाढत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. यामुळे आरोग्ययंत्रणेवरील ताण अधिक वाढला असून, औषधांसह आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. यामुळे भारतासमोर निर्माण झालेल्या या संकटात जगभरातील अनेक देशांकडून मदतीचा हात देखील पुढे करण्यात आला आहे. आज भारताचे लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन, त्यांच्याशी कोरोनाविरोधातील या लढाईसाठी भारतीय सैन्य दलाकडून घेतल्या जात असलेल्या विविध उपक्रांमाबाबत माहिती दिली व चर्चा केली.
नरवणे यांनी सांगितले की, लष्कराकडून नागरिकांसाठी शक्य असेल त्या ठिकाणी रूग्णालयं सुरू केली जात असल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली आहे. नागरीक त्यांच्या जवळील रूग्णलयात जाऊ शकतात. असं देखील लष्करप्रमुख म्हणाले आहेत.
लष्करप्रमुख नरवणे यांनी पंतप्रधानांना सांगितले की, आयात केलेले ऑक्सिजन टँकर आणि वाहनं जिथं त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष कौशल्यं आवश्यक असेल तेथे सैन्यदल मनुष्यबळासह मदत करत आहे.