मेहुणबारे येथे पाच फुटाचा विषारी कोब्रा पकडला!

चाळीसगाव,प्रतिनिधी| तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्थानकाच्या लाईनमध्ये एका छतावर विषारी कोब्रा साप गुरुवार रोजी आढळून आला होता. याबाबत सर्पमित्र मयूर कदम यांना कळताच त्यांनी सदर ठिकाण गाठून पाच फुटाचा विषारी कोब्रा साप पकडला. यामुळे खूप मोठा अनर्थ टळला.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्थानकाच्या लाईनमध्ये एका छतावर पाच फुटाचा विषारी कोब्रा साप एका चिमुकल्याला गुरुवार रोजी दिसून आला. याबाबत त्या चिमुकल्यांनी घरच्यांना सांगितले. लागलीच पोलीसांनी सर्पमित्र मयूर कदम यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला. त्यावर सर्पमित्र मयूर कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर ठिकाण गाठले. पाच फुटाचा विषारी कोब्रा साप हा एका छतावर असल्याने त्यांनी शिडीच्या सहाय्याने छतावर चढून कोब्रा पकडला. व त्याला मल्हारगडावर सुखरूप सोडण्यात आले आहे.
यामुळे खूप मोठा अनर्थ टळला. याबाबत सहा पोलीस निरीक्षक पावन देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्पमित्र मयूर कदम याचे आभार मानले. दरम्यान सर्पमित्र मयूर कदम यांनी कोरोनाच्या काळात हजारो विषारी व बिन विषारी सर्पांना जंगलात नेऊन सुखरूप सोडला. सर्प पकडणे हा त्याचा छंद असल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला सर्पदंश झाला. म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीप्रमाणे व सामाजिक सेवामुळे तो सुखरूप बरा झाला. तत्पूर्वी सर्पमित्र मयूर कदम यांची घरात हलाखीची परस्तीती आहे. यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी तो मिळेल ते कामे करीत असतो. यातून मिळालेल्या दोन पैशातून आपल्यासह घरच्यांची उपजीविका तो भागवीत असतो. दरम्यान सर्पमित्र कदम याला कोणत्याही ठिकाणाहून सर्पबाबत फोन आला. तर त्याठिकाणी जाण्यासाठी सायकल किंवा दुचाकी यातील काहीच नसल्याने त्याला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. हि बाब लक्षात येताच सामाजिक भावनेतून वर्धमान धाडीवाल, लक्ष्मण शिरसाठ, नानासाहेब बागुल, मुराद पटेल, दिलीप घोरपडे यांच्यासह राहा अपडेट या सोशल माध्यमातून मयूरला गेल्या काही महिन्यांपूर्वी दुचाकी घेऊन दिली. यामुळे आता त्याचा मार्ग सोयीस्कर झाला आहे. परंतु घरात विश्व दरीद्री व बेरोजगार असल्यामुळे तो मिळेल ते कामे करीत आहेत. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांसह आमदार, खासदार व प्रशासंनानी मिळून सर्पमित्र मयूर कदम याला शासकीय प्रमाणपत्र देऊन मानधन सुरु करायला हवे. अशी मागणी ठिकठिकाणाहून करण्यात येत आहे.

Protected Content