लखनऊ: वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश सरकार ‘लव्ह जिहाद’विरोधी कडक कायदा आणू पाहत असताना, अलाहाबाद हायकोर्टाने कथित लव्ह जिहादच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना सलामत अंसारीविरोधात दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला आहे.
एका व्यक्तिगत संबंधांमध्ये हस्तक्षेप करणे दोन व्यक्तींच्या पसंतीच्या स्वातंत्र्याच्या अधिकारावर गंभीर अतिक्रमण होईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
कोर्टाने म्हटले, ‘कायदा हा कोणत्याही व्यक्तीला आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत राहण्याची परवानगी देतो, मग ते समान किंवा वेगळ्या धर्माचे असले तरी. हा जीवन आणि व्यक्तिगत स्वांतंत्र्याच्या अधिकाराचा मूलभूत भाग आहे.’
उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे राहणारे सलामत अंसारी आणि प्रियंका खरबार यांनी आपल्या कुटुंबाच्या मर्जीविरोधात जाऊन गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लग्न केले होते. प्रियंकाने लग्नापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून आलिया असे ठेवले होते.
प्रियंकाच्या कुटुंबाने सलामतवर अपहरण आणि लग्नासाठी मोहात पाडून पळवून लग्न केले असा आरोप केला. तिच्या कुटुंबाने तशी तक्रारही दाखल केली होती. एफआयआरमध्ये POCSO कायदा देखील लावला होता. जेव्हा लग्न झाले तेव्हा प्रियंका अल्पवयीन होती असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
सलामतने आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती करून अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सलामतच्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाने ११ नोव्हेंबरला हा निकाल जाहीर केला.