नवी दिल्ली : वृत्तसंस्था । चीनने पूर्व लडाखमधील सीमा भागात सैन्याच्या कारवाया वाढवल्या आहेत. या भागात चीनने युद्धसराव सुरु केला आहे
जून २०२० मध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीतील चिनी सैन्यासह झालेल्या संघर्षानंतर सीमेवर अद्याप शांतता नाही.दोन्ही देशांचे सैन्य अजूनही एकमेकांसमोर उभे आहेत. पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच चीनकडून कुरापती सुरुच आहे. तरी, चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. सीमेजवळील हवाई कारवायांबरोबरच चीनच्या युद्ध अभ्यासावर लक्ष ठेवून आहे असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले
काही दिवसांपूर्वी, चीनच्या हवाई दलाने लढाऊ विमानांसह पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीच्या हवाई हद्दीत एक मोठा युद्धसराव केला होता. चिनी हवाई दलाच्या सुमारे दोन डझन लढाऊ विमानांनी या सरावात भाग घेतला होता असे सांगण्यात येत आहे. या लढाऊ विमानांमध्ये जे -११ आणि जे -१६ चा समावेश होता.
चीनच्या हवाई दलाने तिबेट आणि झिनजियांग प्रांतातील वेगवेगळ्या एअरबेसमध्ये युद्धअभ्यास केला होता. यामध्ये गर-गुनसा, कासार, होपिंग, डोन्गा-जोंग, लिंझी या ठिकाणांचा समावेश होता. लढाऊ विमानांबरोबरच चिनी हवाई दलाने या सरावात हवाई-संरक्षण यंत्रणा समाविष्ट केली होती. जेणेकरून दुसर्या देशातील लढाऊ विमानांनी त्याच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला तर त्यांना कारवाई करता येईल.
भारत चीनच्या युद्धसरावार लक्ष ठेवून आहे. भारतीय सैन्यदेखील सातत्याने युद्धसराव करत आहे. “चिनी सैन्य त्यांच्या भागात युद्धसराव करत आहेत. आम्ही आमच्या बाजूनेदेखील युद्धअभ्यास करत आहोत,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनने सीमेवर आपले सैन्य आणि युद्धसामग्री आणल्याने तिथून सैनिक पुढे येऊ शकतात. त्यामुळे भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी २८ मे रोजी सांगितले होते.
भारत चीन सीमेवरील परिस्थिती गेल्या वर्षभरापासून बदलेली नाही. लडाखच्या सीमेवर दोन्ही देशांचे ५० ते ६० हजार सैनिक तैनात आहेत. पँगाँग सरोवरच्या परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर सैनिक हटवण्यात आलेले नाहीत. लडाख तिबेट सीमेवरदेखील सारखीच परिस्थिती आहे. दोन्ही देशांचे हवाई दल तिथे तैनात करण्यात आलं आहे.