लडाखच्या चुशूल सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने चीनच्या सैनिकाला पकडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात भारतीय लष्कराने चीनच्या एका सैनिकाला पकडले. पीपल्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक दिशा भरकटला होता. चुकून तो भारतीय हद्दीत आल्याची माहिती मिळत आहे.

आज उशिरा किंवा रविवारी या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाऊ शकते. या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय हद्दीत आलेल्या अशाच एक चिनी सैनिकाला लष्कराने पकडले होते. पण काही दिवसातच प्रक्रियेनुसार, त्याला परत चीनकडे सोपवण्यात आले. पूर्व लडाखमध्ये मागच्यावर्षीपासून भारत-चीनमध्ये कमालीचा तणाव आहे.

दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. फायटर विमानांसह अत्याधुनिक शस्त्रास्त्र दोन्ही बाजूंनी तैनात केली आहेत. लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही अजूनही सीमावादाचा तिढा सुटलेला नाही. चीनच्या आक्रमकतेमुळे हा वाद निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने प्रत्येक आघाडीवर चिनी सैन्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

जून महिन्यात पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यानंतर पँगाँग सरोवराच्या परिसरात गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत. चीन पँगाँग सरोवराच्या फिंगर फोर भागातून माघार घेत नाहीय. याच भागातील महत्त्वाच्या टेकडया भारतीय सैन्याने आपल्या ताब्यात घेऊन चीनवर रणनितीक दृष्टीने वर्चस्व मिळवले आहे.

Protected Content