मुंबई (वृत्तसंस्था) तांबडी बुद्रुक येथील घटनेचा तपास नि:पक्षपातीपणे करावा, तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषींवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
रायगड जिल्ह्यातील तांबडी बु. (ता.रोहा) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे महेश डोंगरे व महेश राणे यांच्याकडून गृहराज्यमंत्री देसाई यांना निवेदन सादर केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाईचे श्री. देसाई यांचे संबंधितांना निर्देश दिले आहेत. यासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देसाई म्हणाले की, तांबडी बुद्रुक येथील घटनेचा तपास नि:पक्षपातीपणे करावा, तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषींवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. दरम्यान, तांबडी येथे २६ जुलै २०२० रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. तांबडी येथील बलात्कार आणि खून प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.