पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळाबाजारात विक्री करणाऱ्या दोघांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील जिवाळी येथे मालवाहू रिक्षातून रेशनचा तांदूळ विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पारोळा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक विश्वजीत गिरासे यांना मिळाली. त्यानुसार पारोळा येथील पुरवठा विभागाच्या पथकाने गुरूवार १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता धडक कारवाई करत मालवाहू रिक्षा चालकावर कारवाई केली. त्याची विचारपूस केली असता मनोज दिलीप चौधरी रा. विचखेडा ता. पारोळा असे नाव सांगितले. त्याने रेशन दुकानदार रमेश भावराव पाटील रा. जीराळी ता. पारोळा यांच्याकडून आपण तांदूळ विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने रेशन दुकानाची तपासणी केली असता ५ तांदूळाच्या गोण्या आढळून आल्या नाही. यासंदर्भात पुरवठा तपासणी अधिकारी रविंद्र महाडीक यांनी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रेशन दुकानदार रमेश भावराव पाटील रा. जीराळी ता. पारोळा आणि मनोज दिलीप चौधरी रा. विचखेडा ता. पारोळा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.