रिपब्लिक सीईओ मुंबई  पोलिसांच्या विशेष पथकाच्या ताब्यात 

 

मुंबई, वृत्तसंस्था । रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाद्वारे अटक करण्यात आली आहे. या अटकेने टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीशी संबंधित दुसऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानी यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण अटक आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे. टेलिव्हीजन क्षेत्रातील सर्वात मोठा टीआरपी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी अटकसत्र सुरू ठेवले आहे. याआधी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांना ठाण्यातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात थेट सहभाग आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. टीआरपी घोटाळ्यामध्ये आतापर्यंत सुमारे ४६ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. १३ आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान महामूव्ही वाहिनीचे मार्केटिंग प्रमुख अमित दवे, सीईओ संजीव वर्मा यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

Protected Content