हैदराबाद । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहूल यांचे नागरिकत्व लवकरच रद्द होणार असून अमित शाह यांच्याकडे ही फाईल आली असल्याचा दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
हैदराबाद विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावर भाष्य करताना सोनिया आणि राहुल गांधींचं नागरिकत्व लवकरच रद्द होणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, अमित शहांच्या टेबलवर एक फाईल आहे. त्यामुळे लवकरच त्या दोघांचंही नागरिकत्व जाणार आहे. एखाद्या भारतीय व्यक्तीनं दुसर्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यास त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं. संविधानात तसं नमूद करण्यात आलेलं आहे. राहुल गांधींना इंग्लंडमध्ये व्यवसाय सुरू करायचा असल्यानं ते लवकरच इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारणार असल्याचा दावा स्वामींनी केला. राहुल यांचे वडील (राजीव गांधी) भारतीय होते. त्यामुळे ते भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. मात्र सोनिया गांधी तसं करू शकत नाहीत, असं ते पुढे म्हणाले.