‘राष्ट्रवाद’ ही अलिप्तपणे समजून घ्यावयाची बाब नाही

 

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘राष्ट्रवाद’ ही अलिप्तपणे समजून घ्यावयाची बाब नाही. तत्कालीन परिस्थिती आणि तथ्ये यानुसार ती समजून घेतली पाहिजे. आधुनिकपूर्व आणि आधुनिक काळात जगभरातील अभ्यासकांनी मांडलेल्या ‘राष्ट्र’ या संकल्पनेच्या विविध छटा राष्ट्र ही संकल्पना समजून घेण्यास सहाय्यभूत ठरतात असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठातील इतिहासाचे अभ्यासक डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी केले.

मूळजी जेठा महाविद्यालयातील इतिहास विभाग, सामाजिकशास्त्रे प्रशाळा आणि प्रागतिक इतिहास संस्था यांच्या वतीने ‘भारताची परिकल्पना: ऐतिहासिक स्थित्यंतरे आणि आव्हाने’ या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. राष्ट्र ही संकल्पना सामाजिक-सांस्कृतिक विविधतेतून विकसित झालेली आहे. फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती यातून राष्ट्रवादाला अधिक बळकटी प्राप्त झाली. जागतिक पातळीवरील विविध इतिहासकारांनी राष्ट्र आणि राष्ट्रवाद याविषयी केलेल्या मांडणीचे अनेक संदर्भ त्यांनी यावेळी उलगडले. राष्ट्र ही संकल्पना भाषा, इतिहास, संस्कृती, कला या सर्व घटकांनी दृढ केली असेही ते म्हणाले. एकोणिसाव्या शतकात उदयाला आलेल्या स्वछंदतावादी चळवळीने सर्वच संकल्पना आणि क्षेत्रांवर प्रभाव टाकला. त्यानंतरच्या टप्प्यावर प्रजासत्ताकाची संकल्पना विकसित झाली असे त्यांनी सांगितले. विसाव्या शतकात विविध इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ यांनी नाझींच्या संदर्भातदेखील मांडणी केली. ग्राम्शी, कार्ल मार्क्स यांनी राष्ट्र या संकल्पनेसंदर्भात  केलेले सिद्धांतन महत्त्वाचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन जळगाव विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, इतिहासकारांनी आपल्या सभोवताली असलेल्या विविध सांस्कृतिक प्रतीकांचा शोध घेतला तर इतिहास अभ्यासाला चालना मिळू शकते. आपल्या पुढील पिढ्यांपर्यंत वस्तुनिष्ठ आणि परिपूर्ण इतिहास पोहोचविण्याची जबाबदारी इतिहास अभ्यासकांची आहे. त्यामुळे वास्तवनिष्ठ आणि तथ्याधारित इतिहास लोकांसमोर येईल असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे होते. यावेळी बोलतांना  त्यांनी या परिषदेत विविध इतिहास अभ्यासक भारताच्या परिकल्पनेसंदर्भात आपले अनुभव आणि ज्ञानात्मक देवाणघेवाण करतील. यातून निश्चितच काही तथ्ये समोर येतील. या परिषदेचा उपयोग सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना होईल असा आशावाद व्यक्त केला.

परिषदेचे प्रास्ताविक सामाजिकशास्त्रे प्रशाळेचे संचालक इतिहास विभागप्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे यांनी केले. या परिषदेच्या आयोजनामागील हेतू त्यांनी यावेळी विशद केला. देशभरातील विविध अभ्यासक भारताच्या संदर्भात घडलेली ऐतिहासिक स्थित्यंतरे आणि आज देशासमोर असलेली आव्हाने या परिषदेत विचार मांडणार आहेत ही महत्त्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी सांगितले. प्रागतिक इतिहास संस्थेचे प्रा. जगदीश सोनवणे यांनी प्रागतिक इतिहास संस्थेची कार्यप्रणाली आणि उपक्रम याविषयी माहिती दिली. यावेळी मंचावर प्रागतिक इतिहास संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायण भोसले, ( इतिहास विभाग, मुंबई विद्यापीठ), महाविद्यालयाचे भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसूरउपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. कीर्ती सोनावणे यांनी मानले.

दुपारच्या  सत्रात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे डॉ. इशरत आलम यांनी ‘१२व्या शतकापर्यंतची भारताच्या कल्पनेची धारणा’ या विषयावर विचार मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी ‘प्राचीन संस्कृत ग्रंथांमधील राष्ट्राची कल्पना या विषयावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे यांनी ‘भगवद् गीतेतील स्वातंत्र्याची कल्पना आणि भारताची कल्पना यातील विरोधाभास’ या विषयावर, मुंबई विद्यापीठातील डॉ. नारायण भोसले यांनी ‘भारतातील भटके आणि भारताची कल्पना’ या विषयावर आणि डॉ. देवकुमार वासुदेवन, मध्यप्रदेश  यांनी आपले विचार मांडले. या सत्रात विविध अभ्यासकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर साधकबाधक चर्चा झाली. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत देशभरातून साठपेक्षा अधिक संशोधक व प्राध्यापक सहभागी झालेले आहेत.

Protected Content