जळगाव प्रतिनिधी । राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी परिक्षेबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व फार्मसी स्टुडंट काउन्सीलने केले असून आपल्या मागणीची दखल घेण्यात आल्याचे पत्रकान्वये जाहीर केले आहे.
याबाबत वृत्त असे की, कोरोनामुळे सुरू असणार्या लॉकडाऊनचा परिणाम एप्रिल मे मध्ये होणार्या परीक्षांच्या नियोजनावर झालेला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या अंतर्गत असलेले सर्व पदवी शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट दुसर्या वर्षात प्रवेश द्यावा व दुसर्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट तृतीय वर्षात व तृतीय वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षात व चतुर्थ वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा काही प्रोजेक्ट असेल वा काही सबमीशन असेल ते महाविद्यालयाने त्यांच्या मेलद्वारे मागवून त्यावर त्यांची गुणवत्ता ठरवून त्यांनाही दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व फार्मसी स्टुडंट काउन्सीलने केली होती.
या मागणीची दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. त्यांनी या संदर्भात शासनाने निर्णय घेतला की पहिल्या ,दुसर्या व तिसर्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या व अतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील असा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व फार्मसी स्टुडंट काउन्सीलने केले आहे. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनावर राष्ट्रवादीचे महानगर सचिव अॅड. कुणाल बी पवार, फार्मसी स्टूडेंट कौन्सिल अध्यक्ष भुषण संजय भदाणे; माजी सिनेट सदस्य अतुल कदमबांडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील; अमोल राणा पाटील
(जिल्हा कार्याध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल नंदुरबार) आणि महेश पाटील (जिल्हा अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल जळगाव) यांच्या स्वाक्षर्या आहेत.