मुंबई प्रतिनिधी । आपल्या सुनेने विवाहबाह्य संबंध असून पती-पत्नीच्या वादात मला नाहक ओढण्यात आल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप फेटाळून लावले आहे.
दुसर्यांदाही मुलगी झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि कुटुंबियांनी छळ केल्याचा आरोप सुनेकडून करण्यात आला आहे. या संदर्भात विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा पती), दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज सकाळी आमदार विद्या चव्हाण यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट केली आहे. विद्या चव्हाण यांनी कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप फेटाळले आहेत. आपल्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असून पती आणि पत्नीत यावरून वाद झालेत. यात आपल्याला नाहक ओढण्यात आल्याची पुष्टीदेखील त्यांनी जोडली आहे.