मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नवाब मलिक यांच्या विविध ठिकाणी असलेल्या मालमत्ता इडी कडून जप्त करण्यात आल्या आहेत. यात कुर्ला, वांद्रे, ठाणे येथील फ्लॅटसह उस्मानाबादेतील १४८ एकर जमिनीचा समावेश आहे.
दाऊद इब्राहिम मनी लोन्ड्रीग प्रकरणी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (इडी)कडून अटक करण्यात आली होती. हसिना पारकरच्या मालकीची ३०० कोटींची जमीन केवळ ५५ लाखांना खरेदी केल्याचा आरोप मंत्री मलिक यांच्यावर आहे. त्यात मंत्री मलिक यांच्या एकूण आठ मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) जप्त करण्यात आल्या आहेत. यात कुर्ला पश्चिम येथील व्यावसायिक जागा, तीन फ्लॅट्स, कुर्ला येथीलच गोवावाला कम्पाउंड मधील व्यावसायिक जागा, वांद्रे पश्चिम येथे दोन फ्लॅट्स, ठाण्यामधील मालमत्ता आणि उस्मानाबाद येथील १४८ एकर जमिनीचा समावेश असून या सर्व मालमत्ता मंत्री मलिक आणि त्यांच्या नातेवाईक यांच्या नावावर असल्याचे माहितीत म्हटले आहे.
मलिक यांच्यावर मनी लोन्ड्रीगचा तसेच अंडरवर्ल्ड आणि सन १९९३ च्या बॉम्बस्फोटामागील आरोपींशी संबंध असून मालमत्ता खरेदी केल्याचाही आरोप आहे. याशिवाय दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातीत मालमत्ता बळकावण्यासह ईडीने मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप असून मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथील तीन एकर जमीन मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांच्या मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या याचिकेत मलिक यांनी न्यायालयाकडे तात्काळ सुटकेची मागणी केलेल्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी दर्शवली आहे.