राष्ट्रपती राजवटीच्या मागणीसाठी रामदास आठवले राष्ट्रपतींच्या भेटीला

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी  केली.

 

महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, राज्य सरकारवरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन दिले.

 

यावेळी झालेल्या चर्चेत माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीचा विचार करू, असे आश्वासन दिले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आणि त्यानंतर झालेल्या घटनाक्रमात महाराष्ट्रच्या गृह विभागाची प्रतिमा कलंकित झाली आहे. सचिन वाझे प्रकरण; त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप; महिन्याला 100 कोटींची हफ्ता वसुली या सारख्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा डागाळली त्याबरोबर जनतेत भीतीचे वातावरण आहे. जोपर्यन्त महाराष्ट्राचे राज्य सरकार बरखास्त होत नाही तो पर्यंत या गंभीर आरोपांची निष्पक्ष सखोल चौकशी होणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

 

कोरोनाच्या महामारीचा महाराष्ट्रात वेगाने फैलाव होत आहे. तीन पक्षांचे राज्य सरकार निर्णय घेण्यात कमालीचे उदासीन असून राज्याचा विकास खुंटला आहे. नाकर्तेपणा असलेल्या राज्य सरकारमुळे जनतेत निराशेचे वातावरण आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

 

निसर्ग वादळ, कोरोना संकट सर्व आघाड्यांवर निष्क्रिय राहिलेले महाविकास आघाडीचे राज्य सरकार आहे. महाराष्ट्राचे राज्य सरकार त्वरीत बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्याबाबतचे निवेदन आज राष्ट्रपतींना रामदास आठवले यांनी दिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत विचार करू, असे आश्वासन राष्ट्रपतींनी दिले असल्याचे रामदास आठवले यांनी  सांगितलं.

Protected Content