रावेर प्रतिनिधी । केंद्र सरकारने लावलेला कांदा निर्यात बंदी मागे घ्यावे यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याच्या आशयाचे निवेदन रावेर तालुका कॉग्रेस पक्षा तर्फे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरात लॉकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पन्न घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागत लागल्याने दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण केंद्रातील मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.
तीन महिन्यापूर्वी म्हणजे ४ जून २०२० रोजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती आणि ३ महिन्यात घुमजाव करत निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणी निवेदनात केली आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या निवेदनावर कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, जिल्हा कार्यध्यक्ष राजू सर्वेंणे, प्रतिभा मोरे, डॉ.शब्बीर शेख, सूर्यभान चौधरी, संतोष पाटील, रामदास लहासे, प्रकाश सूरदास, मनिषा पाचपांडे, अँड.योगेश गजरे, विकास मराठे, संजय पाटील, काशिनाथ महाजन, भूषण पाटील, शांताराम पाटील, कैलास महाजन, डॉ. धनराज महाजन आदी कॉग्रेस पदाधिकाऱ्यांच्या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या.