रावेर, शालिक महाजन । गॅस दरवाढ झाल्याने महिलांची तारांबळ उडत आहे. ही दरवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष माया बारी यांनी केली. त्या केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात बोलत होत्या.
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व गॅसदर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या महिला पदाधिका-यांनी निदर्शने केली. यावेळी पेट्रोलचे दर कमी करावे तसेच गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्यासाठी माजी आमदार अरुण पाटील यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांतर्फे गॅस सिलेंडरला हार चढविण्यात आला. याप्रसंगी महिला सरचिटणीस राष्ट्रवादी नंदीनी पंत, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख आदींसह महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.