रावेर प्रतिनिधी । शहरात मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे रावेर शहरात वीजपुरवठा खंडीत झाला. त्यानंतर वीजेचा लपंडाव सुरू झालाय. विशेष म्हणजे शहरातील मुख्य भागात असलेले कोरोना केअर सेंटर हे रात्रभर अंधारात आहे. यामुळे रूग्णांसह नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मंगळवारी २ जून रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे रात्री १ वाजेदरम्यान रावेर शहरातील वीजपुरवठा खंडीत होता. दुसऱ्या दिवसी बुधवारी ३ जुन रोजी सकाळी १० वाजता वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता. रात्रभर वीज नसल्याने नागरिक हैराण झाले होते. गेल्या आठवड्यापासून वीज वितरण कंपनीतर्फे पावसाळ्यापूर्वीची कामे सुरु असल्याने दररोज शहरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.
तीन दिवसांपुर्वी पाल परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याने या परिसरात वीजवाहिनी तारा तुटल्या होत्या. तर काही ठिकाणी यामुळे खांब वाकल्याने वीजपुरवठा खंडित झाला. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत केला होता. मंगळवारी रात्री वादळी पावसामुळे रावेरकर रात्रभर अंधारात होते.
कोरोना कोविड सेंटरही अंधारात
शहरातील वीजपुरवठा रात्रभर खंडित झालेला असल्याने त्याचा फटका येथील सामाजिक न्याय विभागाच्या मागसवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील कोरोना कोविड सेंटर व बुऱ्हाणपूर रस्त्यावरील नाईक महाविद्यालयाच्या वसतिगृहात दाखल असलेल्या रुग्णांना बसला आहे. रात्रभर वीज नसल्याने हे दोन्ही सेंटर अंधारात बुडालेले होते. आज सकाळी १० वाजता येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.