रावेर प्रतिनिधी । काल रात्री जनता कर्फ्यू सुरू असतांनाच प्रार्थना स्थळातून बाहेर पडणार्या जमावाने दगडफेक सुरू केल्याने येथे तणाव पसरला असून पोलीसांनी रात्रीपासूनच धरपकड सत्र सुरू केले आहे.
याबाबत वृत्त असे की, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला असतांनाही एका प्रार्थनास्थळात मोठ्या प्रमाणात जमाव गेला. येथून बाहेर पडल्यानंतर या जमावाने दुसर्या गटावर दगडफेकीसह हल्ला चढविल्याने परिसरात खळबळ उडाली. या जमावाने बारी वाड्यातील दोघांना गंभीर जखमी केले. तर दुसरीकडे रसलपूर रस्त्यावर एक जण जखमी झाला. जखमींना रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत फैरी झाडाव्या लागल्या होत्या. काल रात्री उशीराच मोठ्या प्रमाणात पोलीसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दंगलीतील आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काल रात्रीच रावेरात दोन दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने आज सकाळपासून रस्त्यावर कुणीही नागरिक दिसत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, दंगल उसळल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर अधिक्षक भाग्यश्री नवटके, प्रांताधिकारी अजित थोरबोले व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी रात्री उशीरापर्यंत शहरात तळ ठोकून प्रशासकीय उपाययोजनांवर लक्ष ठेवले. पहाटे सुमारे तीन वाजेपर्यंत हे सर्व अधिकारी शहरातच होते. तर आमदार शिरीषदादा चौधरी आणि अन्य लोकप्रतिनिधींनही रावेरला भेट दिल्याचे वृत्त आहे.