रावेरमध्ये केळीपासून स्पिरिट निर्मिती युनिट स्थापन करा: आमदार अमोल जावळे

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात केळीपासून स्पिरिट निर्मिती युनिट स्थापन करण्याची मागणी आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत केली आहे. इथेनॉलच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, केळीपासून स्पिरिट निर्मितीला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रावेर तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, उसाच्या तुलनेत केळीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने इथेनॉल निर्मितीसाठी हा पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

या युनिटच्या स्थापनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला स्थिर बाजारपेठ मिळेल, कृषी क्षेत्राचे आर्थिक सशक्तीकरण होईल आणि शेतीपूरक उद्योगांना चालना मिळेल, असे आमदार जावळे यांनी सांगितले. तसेच, मोलॅसिसऐवजी केळीचा वापर करून इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसावर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल आणि शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रावेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना आधुनिक संशोधनाचा लाभ मिळावा, तंत्रज्ञानविषयक माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी, तसेच सुधारित कृषी पद्धतींचा वापर करता यावा, यासाठी “टेक्नोलॉजी ट्रान्सफर सेंटर” स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार जावळे यांनी विधानसभेत सांगितले. केळी उत्पादनासंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञान, सुधारित लागवड पद्धती, कीड व रोगनियंत्रण यासारख्या महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक असल्याचे आमदार जावळे यांनी सांगितले. रावेर विधानसभेतील ४२ गावांतील शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही, ही गंभीर बाब असून शासनाच्या विलंबामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नुकसान भरपाई प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्याची गरज असल्याचे त्यांनी विधानसभेत अधोरेखित केले.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दावोस येथे ₹१५.७५ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी करार साइन केला असून, त्यानुसार महाराष्ट्रात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न ठेवता, लहान शहरांमध्ये केली तर तेथे उद्योगधंदे विकसित होतील आणि अर्बन ग्रोथ सेंटरची संकल्पना पुढे येईल, असे आमदार जावळे यांनी सांगितले. त्याच अनुषंगाने, रावेर मतदारसंघातही असे अर्बन ग्रोथ सेंटर स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी केली. या भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या आहे, त्यामुळे या क्षेत्राला डी-प्लेस झोन म्हणून घोषित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Protected Content