Home Cities जळगाव रायपूर येथे सैनिकाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य रॅली

रायपूर येथे सैनिकाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य रॅली

0
11

रायपूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर येथे सागर मोहन परदेशी या जवानाने भारतीय सैन्यात १७ वर्ष देशसेवा बजावल्यानंतर १६७ फिल्ड रेजिमेंट मध्ये लान्स नायक या पदावर सन्मानाने सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळ गावी रायपूर येथे परतलेल्या सैनिकाचे ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्यावतीने अत्यंत उत्साहात व भारावलेल्या वातावरणात सपत्नीक स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि भारत मातेच्या जयघोषात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी ऐन तारुण्यात लष्करामध्ये दाखल झालेल्या या वीर जवानाने विविध अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक भागात आपले कर्तव्य बजावले. प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर ते सेवानिवृत्त होऊन गावी परतले. वीर जवान गावी पोहोचताच मुख्य प्रवेशद्वारावरच गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून सैनिकाची रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, आणि ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

मिरवणुकीनंतर आयोजित विशेष सत्कार सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सेवानिवृत्त सैनिकाचा सपत्निक भव्य नागरी सत्कार करण्यात आला. “मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य होते. सेवा बजावताना देशवासियांचे आणि गावाचे प्रेम पाठीशी राहिल्यानेच सर्व आव्हानांवर मात करता आली,तरुणांना मार्गदर्शन करताना मेहनत करावी यश नक्की मिळते, गरज भासल्यास मी तरुणांना मार्गदर्शन करायला कधीही तयार आहे ” अशा शब्दांत सेवानिवृत्त जवान सागर परदेशीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी रॅलीमध्ये संदीप सीताराम परदेशीं, चेतन कैलास परदेशी psi, मानसिंग खेमसिंग परदेसी, प्रविन लक्ष्मण पद्धती, सिताराम मोहन परदेसी, सागर संजय परदेशी, प्रदीप परदेशी, पवन ईश्वर परदेशी, धीरज अर्जुन परदेशी, नर्सिंग लूमसिंग परदेसी, प्रकाश उखर्डू परदेशीं, दिलीप किसन परदेशी, राहुल जयसिंग परदेशीं,मयूर लुमसिंग परदेशी, सुमेर भास्कर परदेशीं, संदीप पद्माकर शुक्ल, मुकेश परदेशी आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्तित होते.


Protected Content

Play sound