Home Cities जामनेर जामनेर पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन ; घरफोडी, वाहन चोरी आणि सायबर फसवणूक...

जामनेर पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन ; घरफोडी, वाहन चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी घ्या खबरदारी

0
13

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । घरफोडी, वाहन चोरी तसेच सायबर फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी जामनेर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “सावध नागरिक, सुरक्षित गाव” या संदेशातून नागरिकांनी आपल्या घरासह वाहन, शेतीतील साहित्य आणि ऑनलाइन व्यवहारांच्या सुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी केले आहे.

घर बंद करून बाहेर जाताना नागरिकांनी घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद करून त्यांना अतिरिक्त लॉक किंवा ग्रीलची व्यवस्था करावी. शक्य असल्यास नॉब लॉक, स्वयंचलित कुलूप किंवा मजबूत कडीचा वापर करावा. घराच्या परिसरात तसेच प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. घर काही काळासाठी बंद ठेवून बाहेर जाताना घरात आणि घराबाहेर किमान एक दिवा सुरू ठेवावा. मौल्यवान दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. घर बंद असल्याची माहिती विश्वासू शेजाऱ्यांना द्यावी, जेणेकरून परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देता येईल.

दुचाकी चोरीच्या घटना टाळण्यासाठी वाहनधारकांनी मोटारसायकलचे हँडल लॉक करण्यासोबतच शक्य असल्यास अतिरिक्त साखळी लॉकचा वापर करावा. वाहन शक्यतो सुरक्षित आणि व्यवस्थित पार्किंगच्या ठिकाणी उभे करावे. सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करताना वाहन लॉक केले आहे की नाही, याची खात्री करावी, असेही पोलिसांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनीही शेतातील पाण्याच्या मोटारी, वायर, पाईप आणि इतर शेती साहित्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे. विहीर किंवा गोठ्याजवळ पुरेशी सुरक्षा प्रकाश व्यवस्था करावी. शक्य असल्यास या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून चोरीच्या घटना रोखण्यास मदत होईल.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम किंवा कार्डची माहिती, पासवर्ड अथवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे किंवा अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ऑनलाइन व्यवहार करणे टाळावे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता विलंब न करता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. फसवणुकीनंतर तातडीने तक्रार केल्यास पुढील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना कारवाई करणे शक्य होते.

रात्रीच्या वेळी परिसरात संशयित व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कारवाई न करता तात्काळ जामनेर पोलिस स्टेशनला माहिती द्यावी किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. चोरीची घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या घराची, वाहनाची, शेतीतील साहित्याची आणि ऑनलाइन व्यवहारांची सुरक्षा गांभीर्याने घेत संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी. “सावध नागरिक, सुरक्षित गाव” या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक आणि पोलिसांमधील समन्वय वाढवून चोरी व सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound