जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील एका भागातील ३२ वर्षीय विवाहितेला प्रेमाचे आमिष दाखवून तसेच प्रेमसंबंधाबाबत सर्वाना सांगुन टाकण्याची तसेच तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत एकाने विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दोन वर्षापासून सुरु असलेल्या या प्रकाराबाबत सोमवार, ५ जून रोजी दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की, जळगावातील रामानंदनगर परिसरातील एका भागात विवाहिता वास्तव्यास आहे. दिपक देवानंद टाक याने विवाहितेला प्रेमाचे आमिष दाखविले, तसेच विवाहितेच्या घरी येवून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. दरम्यानच्या काळात विवाहितेने शारिरीक संबंधास नकार दिला असता, दिपक याने आपले प्रेमसंबंध आहे, या बाबत सगळ्यांना सांगून देण्याची तसेच विवाहितेला तिच्या मुलाला जीवे मारुन टाकण्याची धमकी विवाहितेला दिली. धमकीच दिली नाही, तर विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करुन पैशांची मागणी सुध्दा दिपकने विवाहितेकडे केली. अशाप्रकारे धमकी देवून दिपकने दोन वर्षापासून ते आजपावेतो वेळोवेळी विवाहितेवर अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून सोमवार, ५ जून विवाहितेने सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन दिपक देवानंद टाक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक शिल्पा पाटील ह्या करीत आहेत.