राफेल व्यवहारात घोटाळा नसल्याचा डसॉल्टचा खुलासा

 

पॅरिस : वृत्तसंस्था । राफेल विमानांच्या व्यवहारात घोटाळा नसल्याचा खुलासा करीत डसॉल्ट कंपनीने घोटाळ्याचे आरोप ठामपणे फेटाळले आहेत

 

राफेल विमानांच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे आरोप अनेक वर्षांपासून केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी फ्रेंच ऑनलाईन जर्नल   मीडियापार्टने केलेल्या आरोपांची भर पडली आहे.  राफेल  करारामध्ये डसॉल्टने एका भारतीय मध्यस्थाला सुमारे १० लाख युरो दिल्याचा खळबळजनक दावा मिडीयापार्टने आपल्या वृत्तात केला होता. त्यामुळे या मुद्द्यावरू न पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. मात्र, असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचं डसॉल्टने ठामपणे म्हटलं आहे. आपल्या या दाव्यासाठी डसॉल्टकडून फ्रान्समधल्या अनेक संस्थांकडून केल्या जाणाऱ्या तपासणीचा हवाला दिला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

 

 

मीडियापार्टने आपल्या वृत्ताला फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी कारवाया करणारी संस्था एजन्सी फ्रांस अँटी करप्शनने केलेल्या तपासाचा आधार दिला आहे. त्यामुळे यामध्ये तथ्य असल्याचं बोललं जात आहे. मात्र, हे सर्व आरोप डसॉल्टने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “सरकारी अधिकारी, फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था यांनी मिळून या कराराचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा घोटाळा झाल्याचं सापडलेलं नाही. भारताला ३६ राफेल विमानं देण्यासंदर्भातल्या करारात कोणताही गैरप्रकार झालेला नाही”, असं डसॉल्टकडून सांगण्यात आलं आहे.

 

“२००० सालापासूनच डसॉल्टने भ्रष्टाचार, नैतिक तत्व, बाजारातली आपली पत राखण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू केली आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटचे सर्व नियम आणि करार आम्ही पाळतो”, असं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

ज्या मध्यस्थाला ही रक्कम देण्यात आली आहे, त्याचं नाव सुशेन गुप्ता असं सांगितलं जात आहे. या व्यक्तीची आधीच ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे. डसॉल्टच्या २०१७च्या वार्षिक अहवालाची तपासणी केली जात असताना हा प्रकार समोर आल्याचं देखील मीडियापार्टनं म्हटलं आहे.

Protected Content