भुसावळ प्रतिनिधी । राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असल्याचे जोरदार टीकास्त्र आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी सोडले. ते वरणगाव नगरपालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
वरणगाव नगरपालिकेतर्फे आज कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. गिरीश महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष सुनील काळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गिरीश महाजन यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,तीन पक्षाचं असलेल्या या सरकारमध्ये कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. कोणाचं कुणाला काहीही माहिती नाही. मला कोणाबाबतही वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही. पण अंधेर नगरी चौपट राजा अशी परिस्थिती या सरकारची झाली आहे. दरम्यान, भाजप सरकारच्या काळात मात्र जनहिताची अनेक कामे झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
याप्रसंगी आ. गिरीश महाजन पुढे म्हणाले की. राज्य सरकार शेतकर्यांचा कळवळा असल्याचे शासन दाखवते. मात्र, कृषीच्या विजपुरवठ्यात भारनियमन सुरू केले आहे. ट्रान्सफॉर्मर मिळवण्यासाठी शेतकर्यांनी प्रतीक्षा करावी लागते. पावसाळ्यात अतिपावसामुळे शेतकरी अडचणीत आले, तर आता भारनियमनामुळे पिके जळत आहेत. मग राज्य शासनाने दिलेल्या कर्जमुक्तीचा उपयोग काय? शासनाने पाणीपुरवठ्याच्या अत्यावश्यक योजनांना स्थगिती दिली आहे,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले. गेल्या अडीच वर्षात विकास कामांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मदतीने शहरात ६५ कोटी रूपयांचा निधी आणून कामांना चालना दिल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील ७५ लाखांची ई लायब्ररी, बस पिकअप शेड, व्यायाम शाळा, महादेव मंदिर, माळी समाज भुवन, बुध्द विहार, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, घनकचरा प्रकल्प अशा कामांचे लोकार्पण व भूमीपूजन झाले. माजी पं.स.सभापती राजेंद्र चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, चंद्रकांत बढे, अल्लाऊद्दीन शेख, संजय जैन, इरफान पिंजारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अजय पाटील यांनी केले, आभार श्यामराव धनगर यांनी मानले.