मुंबई, प्रतिनिधी । मला तोंड उघडायला लावू नका. भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे असा दावा करत बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं असा इशारा खासदार संजय राउत यांनी दिला आहे. श्री. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना इडीची नोटिस आल्यानंतर यासंदर्भात आज श्री. राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ला चढवला आहे.
राज्यातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. ईडी ही सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात असंही श्री. राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपाचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितलं आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल. भाजपाची काही माकडं अकारण उड्या मारत आहेत असंही श्री. राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपाला महाराष्ट्रात सत्तेपासून वेगळं ठेवल्यामुळे ईडीचा वापर केला जातो आहे. एक काळ होता की ईडी, सीबीआय, सीआडी या विभागांना एक प्रतिष्ठा होती. मात्र आता केंद्रातलं सरकार ईडीचा वापर हे आमच्यावर सूड उगवण्यासाठी करत आहे असा आरोप शिवसेना खासदार श्री. राऊत यांनी केला आहे. कुणी नामर्दपणे असे वार करत असेल तर शिवसेनेला जशास तसं उत्तर देईल असंही श्री. राऊत यांनी म्हटलं आहे.