राज्य सरकार कोटा शहरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणार

मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे कोटा शहरात अडकून पडलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना घरी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली असून याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

राजस्थानातल्या कोटा शहरातील कोचींग क्लासेस प्रसिध्द असून येथे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी जात असतात. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शहरात सुमारे दोन हजार मराठी विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी ट्विट करून आज ही माहिती दिली. येत्या दोन-तीन दिवसात याबाबत प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना घरी आणले जाईल अशी शक्यता आहे. घरी परतल्यानंतर या विद्यार्थ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

याआधी उत्तरप्रदेश व हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी कोटा शहरातून आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना घरी परतण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानंतर उध्दव ठाकरे हे देखील याच प्रकारे विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content