राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करावेत , भाववाढ नियंत्रणात आणावी — देवेंद्र फडणवीस

नागपूर : वृत्तसंस्था । पेट्रोल डिझेल भाववाढीवर शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात ते बोलत होते.

“मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी केले होते. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवावेत. उगीचच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये”, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढतायेत. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती कमी असतानाही आपल्याकडे मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. याच पार्श्वभूमीवर येत्या ५ तारखेला शिवसेना राज्यभर वाढवाढीविरोधात मोर्चे काढून केंद्र शासनाचा निषेध करणार आहे.

हिंदुत्वावर कुणाचीही मक्तेदारी असू शकत नाही. पण उद्धव ठाकरेंना माझा स्पष्ट सवाल आहे की तुम्ही हिंदुत्व का सोडलंय. हिंदुत्व हे जगावं लागतं…. ज्यावेळी जनाब बाळासाहेब होतात, आणि अजान स्पर्धा सुरु होते त्यावेळी भाजपच्या हिंदुत्वावर मुख्यमंत्र्यांना बोलावं लागतं, असा निशाणा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यावर साधला.

राम मंदिरचे पैसे जनतेने द्यावे की सरकारने द्यावे , यावर सामनाचा अग्रलेख येतो पण शरजील प्रकरणावर अग्रलेख यायला 4 दिवस लागतात. यावरुनच कळतं की सरकार शरजीलला पाठीशी घालतंय. आम्ही ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी सरकारला जाग आली आणि कार्यवाही करण्याचं सांगितलं गेलं, असं फडणवीस म्हणाले.

Protected Content